SRH vs RR IPL 2026: काल (13 एप्रिल 2026) संध्याकाळी झालेल्या आयपीएलच्या 21 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघानं राजस्थान रॉयल्स (RR) वर 57 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तसेच हा राजस्थानचा या हंगामातील पहिलाच पराभव होता. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागिल दोन्ही सामने गमवलेल्या हैदराबादकडून फलंदाजी करताना सुरूवातीलाच स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा अभिषेक शर्मा याची विकेट गेली. पण तरीही सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 6 बाद 216 धावांचा मोठा स्कोअर उभारला. यात कर्णधार ईशान किशननं अवघ्या 44 चेंडूंत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 91 धावांची झंझावाती खेळी केली. त्याला हेनरिक क्लासेन (40 धावा) आणि शेवटी नितीश कुमार रेड्डी (28 धावा) यांनी मोलाची साथ दिली. आणि यामुळेच हैदराबादनं डोंगराऐवढा स्कोअर उभा केला.
217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली. प्रफुल हिंगे आणि दुसरा पदार्पण करणारा गोलंदाज साकिब हुसेन (4 बळी) यांच्या माऱ्यामुळे राजस्थानची अवस्था 5 बाद 9 धावा अशी झाली होती. त्यानंतर डोनाव्हन फरेरा (69 धावा) आणि रवींद्र जडेजा (45 धावा) यांनी 118 धावांची भागीदारी करून सामना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो पुरेसा ठरला नाही. राजस्थानचा संघ 19 षटकांत 159 धावांवर सर्वबाद झाला.
या सामन्याचा खरा नायक ठरला तो म्हणजे विदर्भाचा 24 वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे. आयपीएलमध्ये आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या प्रफुलनं पहिल्याच षटकात असा काही पराक्रम केला जो आयपीएलच्या 18-19 वर्षांच्या इतिहासात कधीही घडला नव्हता. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात 3 बळी घेत इतिहास रचला. प्रफुलनं वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस या तिघांनाही शून्यावर बाद करून राजस्थानच्या डावाची दाणादाण उडवली. त्यानं 4 षटकांत 34 धावा देऊन 4 बळी घेतले आणि त्याला ‘सामनावीर’ (Player of the Match) म्हणून गौरवण्यात आलं.
सामना कुठे फिरला?
राजस्थान रॉयल्सनं हा सामना पहिल्याच षटकात गमावला, जिथं प्रफुल हिंगेनं त्यांच्या तीन प्रमुख फलंदाजांना बाद करून त्यांच्या फलंदाजीचा कणा मोडला. 217 सारख्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अशा प्रकारची सुरुवात झाल्यामुळे राजस्थानला या धक्क्यातून सावरता आलं नाही.
प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन कोण आहे?
प्रफुल हिंगे हा नागपूरचा रहिवासी असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाकडून खेळतो. सनरायझर्स हैदराबादनं त्याला 2026 च्या लिलावात 30 लाख रुपयांना आपल्या संघात सामील केलं होतं. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 27 बळी घेतले आहेत.
बिहारमधील गोपालगंजचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाज साकिब हुसेन सध्या आयपीएलमधील आपल्या उत्तम प्रदर्शनामुळे पदार्पणातच चर्चेत आला आहे. कालच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्यानं 4 षटकांत फक्त 24 धावा देऊन 4 महत्त्वाचे बळी टिपले. विशेषतः त्यानं सेट झालेल्या डोनोव्हन फरेराची विकेट काढून राजस्थानच्या विजयाच्या आशा संपवल्या. प्रफुल हिंगेसोबत मिळून त्यानं रचलेला हा विजय त्याच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. साकिब हुसेन याला सुद्धा हैदराबादनं ₹30 लाख या त्याच्या मूळ किमतीतच विकत घेतलं होतं.

