ईडन गार्डन्सवर मुकुल चौधरीचा जलवा; शेवटच्या चेंडूवर लखनऊचा कोलकात्त्यावर विजय!

IPL 2026 KKR vs LSG: काल (9 एप्रिल 2026) झालेल्या आयपीएल सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सनं (LSG) कोलकत्ता नाईट रायडर्सचा (KKR) 3 गडी राखून पराभव केला आहे. गुरुवारी कोलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर पार पडलेला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि चाहत्यांसाठी अत्यंत रोमांचक ठरला. तीनवेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या कोलकात्याला घरच्या मैदानावर विजयाचा दुष्काळ संपवण्याची मोठी संधी होती, मात्र नशिबाने त्यांना साथ दिली नाही.

लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे कोलकत्त्याचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. कोलकात्यानं निर्धारित 20 षटकांत 4 बाद 181 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. कोलकात्त्यासाठी सलामीवीर अजिंक्य रहाणेनं 41 धावा आणि युवा अंगक्रिश रघुवंशीनं 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत डावाचा पाया रचला, तर शेवटच्या षटकांत कॅमरन ग्रीन आणि रोवमन पॉवेलच्या फटकेबाजीमुळे संघाला 180 पार मजल मारता आली.

प्रत्त्युत्तरात 182 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात अतिशय खराब झाली होती. सुरूवातीच्या काही ओव्हर्समध्येच विकेट्स पडल्या होत्या. एका वेळी तर लखनऊचा संघ 128 धावांवर 7 बाद अशा बिकट अवस्थेत होता आणि कोलकात्त्याचा विजय जवळपास निश्चित वाटत होता. मात्र, तिथून 21 वर्षीय युवा फलंदाज मुकुल चौधरीनं सामन्याचं संपूर्ण चित्रच पालटून टाकलं. मुकुलनं फक्त 27 चेंडूंत नाबाद 54 धावांची झंझावाती खेळी केली, ज्यामध्ये त्यानं 7 षटकार ठोकले. त्याला आयुष बडोनीनं (54 धावा) मोलाची साथ दिली. शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची गरज होती. मुकुलनं त्या ओव्हरला दोन षटकार मारून शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत लखनऊला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मुकुल चौधरी या सामन्यात सर्वाधिक प्रभाव पाडणारा खेळाडू ठरला आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

सामना कुठे फिरला?
सामन्याच्या शेवटच्या षटकात लखनऊला विजयासाठी 14 धावांची गरज होती. वैभव अरोराच्या या षटकात मुकुलनं दोन उत्तुंग षटकार मारून शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत लखनऊला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मुकुलनं आवेश खानसोबत आठव्या विकेटसाठी केलेली नाबाद 54 धावांची भागीदारी आयपीएलमधील यशस्वी पाठलागातील सर्वोच्च भागीदारीपैकी एक ठरली.

सध्या गुणतालिकेत लखनऊ सुपर जायंट्स 3 सामन्यांत 2 विजयांसह 4 गुण मिळवून लखनऊ आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे कोलकत्ता नाईट रायडर्सला चार सामन्यांपैकी तीन पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्यातला 1 सामना अनिर्णित(पंजाबविरूद्ध) आहे आणि त्याच 1 गुणासह सध्या कोलकत्ता नव्यव्या स्थानावर कायम आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.