आयुष शेट्टीचा धमाका; सिंधूची आगेकूच तर लक्ष्य सेन बाहेर!

Badminton Asia Championships 2026: चीनमधील निंगबो येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरीसह मोहिमेला सुरुवात केली आहे. 7 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टीनं जागतिक सातव्या क्रमांकाच्या चिनी खेळाडूचा पराभव करून स्पर्धेत लक्ष्यनीय कामगिरी केली आहे.

निंगबो ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि किरण जॉर्ज यांनीही आपापल्या लढती जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे, मात्र अनुभवी लक्ष्य सेन आणि एच. एस. प्रणॉय यांना पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

20 वर्षीय आयुष शेट्टीनं चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगला 21-13, 21-16 अशा सरळ सेटमध्ये धूळ चारून प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दुसरीकडं, भारताची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूनं मलेशियाच्या वाँग लिंग चिंगविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतरही जबरदस्त पुनरागमन करत सामना 15-21, 21-11, 21-19 असा आपल्या नावावर केला. किरण जॉर्जनंही कझाकस्तानच्या दिमित्री पानारिनला सहज नमवून आगेकूच कायम ठेवली आहे. तसेच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं थायलंडच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत स्थान मिळवलं आहे. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही अव्वल जोडी दुखापतीमुळे स्पर्धेत नसल्यानं आता या खेळाडूंकडूनच पदकाची आशा उरली आहे.

एकीकडं अनेक भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे आणि विजय मिळवले आहेत. तर दुसरीकडं, भारताच्या काही खेळाडूंना पराभवाचे झटके सुद्धा बसले आहेत. कारण भारताची मोठी आशा असलेला लक्ष्य सेन हाँगकाँगच्या ली चेक यू कडून 12-21, 19-21 असा पराभूत झाला आहे. तसेच अनुभवी एच. एस. प्रणॉयला चीनच्या लू गुआंग झू कडून पराभव पत्करावा लागला आहे. तसेच महिला एकेरीत तन्वी शर्मा आणि मिश्र दुहेरीतील रोहन कपूर-रुत्विका शिवानी जोडीचंही आव्हान संपुष्टात आलं आहे.

आता पुढच्या फेरीत पी. व्ही. सिंधूचा सामना जपानच्या दिग्गज अकाने यामागूची हिच्याशी होणार आहे. हा सामना गुरुवारी,9 एप्रिल रोजी खेळवला जाईल. आयुष शेट्टी आणि किरण जॉर्ज यांचेही महत्त्वाचे सामने याच दिवशी होणार असून, या युवा खेळाडूंना पुढील फेरीत पोहोचण्यासाठी जागतिक मानांकित खेळाडूंचे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे. कितीही मोठं आव्हान असलं तरीही भारतीय चाहत्यांना आशा आहेत भारतीय खेळाडू नक्की जिंकतील.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.