भारतीय खेळाडूंची आयएसएसएफ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

ISSF 2026: स्पेनमधील ग्रानाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आयएसएसएफ (ISSF) रायफल आणि पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आपल्या अचूक वेधानं जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. मंगळवारी, 7 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताची स्टार नेमबाज पलक गुलिया आणि युवा प्रतिभावान मुकेश नेलावल्ली यांनी सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे.

नुकत्याच झालेल्या स्पर्धेत या जोडीनं फक्त विजेतेपदच मिळवलं नाही, तर 483.7 गुणांची अभूतपूर्व कमाई करत सिनियर आणि ज्युनियर अशा दोन्ही स्तरावरील नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी उझबेकिस्तानच्या नेमबाजांचा 481.3 गुणांचा जुना विक्रम मोडीत काढून भारतीय नेमबाजीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरलं आहे.

अंतिम फेरीत भारतीय जोडीसमोर चीनच्या कॅई हू आणि कियानझुन याओ या बलाढ्य जोडीचं कडवं आव्हान होतं. मात्र, 18 वर्षीय पलक आणि वरिष्ठ स्तरावर आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या मुकेशनं कमालीचा संयम दाखवला. मुकेशनं 244.7 तर पलकनं 243.0 गुणांचे योगदान देत चीनच्या जोडीचा 2.9 गुणांच्या फरकानं पराभव केला. पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीनं निर्णायक क्षणी दाखवलेली एकाग्रता त्यांच्या विजयाचं मुख्य कारण ठरलं. या स्पर्धेत चीनला रौप्य तर हंगेरीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. तसेच या विजयामुळे भारताने स्पर्धेची सुरुवात अत्यंत दिमाखात केली आहे.

विजेत्या खेळाडूंबद्दल सांगायचं तर, पलक गुलियानं यापूर्वी 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून आपली क्षमता सिद्ध केली होती आणि तिनं आगामी पॅरिस ऑलिम्पिकचा कोटाही मिळवला आहे. तर दुसरीकडं, मुकेश नेलावल्ली हा ज्युनियर विश्वविजेता असून वरिष्ठ स्तरावरील त्याच्या या पहिल्याच पदकानं त्यानं सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

ही प्रतिष्ठित स्पर्धा 5 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत स्पेनमध्ये पार पडत असून, यात जगातील अनेक दिग्गज नेमबाज सहभागी झाले आहेत. भारतीय नेमबाजांच्या या यशामुळे आगामी ऑलिम्पिकसाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.