रग्बीचा दुसऱ्या हंगामाची जूनमध्ये होणार सुरूवात

RPL 2026: भारतात वेगानं लोकप्रिय होत असलेल्या रग्बी खेळाला आता व्यावसायिकतेची नवी झळाळी मिळणार आहे. भारतीय रग्बी फुटबॉल युनियननं (रग्बी इंडिया) आगामी रग्बी प्रीमियर लीग (RPL) च्या दुसऱ्या हंगामाचं वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केलं असून, यंदा ही स्पर्धा तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पार पडणार आहे. मागील वर्षी मुंबईत यशस्वीरीत्या पार पडलेल्या पहिल्या हंगामानंतर, आता 16 जून ते 28 जून 2026 या कालावधीत हैदराबादमधील ऐतिहासिक गच्चीबोवली स्टेडियमवर रग्बीचा थरार पाहायला मिळेल. ही स्पर्धा रग्बीच्या अत्यंत वेगवान समजल्या जाणाऱ्या ‘रग्बी 7’ (Rugby 7s) या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.

गेल्या वर्षीच्या पहिल्या हंगामात दिल्ली रेडझ संघानं अंतिम सामन्यात चेन्नई बुल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं, त्यामुळे यंदा दिल्लीचा संघ आपलं जेतेपद टिकवून ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. या लीगच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि अनुभवी प्रशिक्षकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

रग्बी इंडियाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते राहुल बोस यांनी या लीगबद्दल आपला मोठा दृष्टिकोन व्यक्त करताना सांगितलं की, रग्बी प्रीमियर लीगचं मूळ उद्दिष्ट हे खेळाला फक्त व्यावसायिक बनवणे नसून, तो प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी एक अविस्मरणीय अनुभव बनवणं हे आहे. राहुल बोस यांच्या मते, ही लीग जागतिक दर्जाच्या मानकांनुसार आयोजित केली जात असून, यामुळे भारतीय रग्बीला जागतिक नकाशावर एक नवी ओळख मिळेल. रग्बी इंडियानं यासाठी GMR स्पोर्ट्स सोबत 10 वर्षांची दीर्घकालीन भागीदारी केली आहे, ज्याचा फायदा आगामी काळात ग्रामीण भागातील खेळाडूंना शोधण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी होईल.

यंदाच्या हंगामात मागील वर्षाप्रमाणेच एकूण 6 फ्रँचायझी संघ जेतेपदासाठी झुंज देणार आहेत. यामध्ये बंगळुरू ब्रेव्हहार्ट्स, चेन्नई बुल्स, दिल्ली रेडझ, हैदराबाद हिरोज, कलिंगा ब्लॅक टायगर्स आणि मुंबई ड्रीमर्स या संघांचा समावेश आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.