MI vs RR IPL 2026: आयपीएल 2026 मधील 13 व्या सामन्यात आज (मंगळवार, 7 एप्रिल 2026) राजस्थान रॉयल्स (RR) आणि मुंबई इंडियन्स (MI) हे दोन दिग्गज संघ एकमेकांशी भिडणार आहेत. हा रोमांचक सामना गुवाहाटी येथील एसीए बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.
राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या कमालीच्या फॉर्मात असून त्यांनी यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्सचा पराभव करून सलग दोन विजय मिळवले आहेत. सध्या 4 गुणांसह राजस्थान गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. दुसरीकडं, पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात संमिश्र झाली आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सवर विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, ज्यामुळे सध्या 2 गुणांसह मुंबई सहाव्या स्थानावर असून त्यांना आज विजयाची लय पुन्हा मिळवण्याचं मोठं आव्हान असेल.
या दोन्ही संघाच्या आयपीएल सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 31 सामने झाले आहेत. यात मुंबई इंडियन्सनं 16 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सला 14 सामन्यांत बाजी मारता आली आहे (1 सामना अनिर्णित). जरी ऐतिहासिकदृष्ट्या मुंबईचं पारडं किंचित जड असले, तरी सध्याचा त्यांचा फॉर्म पाहता राजस्थानचं पारडं अधिक जड वाटत आहे. विशेषतः गुवाहाटी हे राजस्थानचं ‘दुसरे घर’ असल्यानं त्यांना स्थानिक वातावरणाचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
आजची संभाव्य प्लेइंग 11 (Probable XI)\
राजस्थान रॉयल्स (RR): वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
मुंबई इंडियन्स (MI): रोहित शर्मा, रायन रिकल्टन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, नमन धीर, हार्दिक पंड्या (कर्णधार), शेर्फेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे/अश्वनी कुमार

