FA Cup 2026: लंडनमधील भव्य ‘लंडन स्टेडियम’वर रविवारी, 5 एप्रिल 2026 रोजी रंगलेल्या एफए कपच्या उपांत्यपूर्व फेरीत लीड्स युनायटेडनं यजमान वेस्ट हॅम युनायटेडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव करून इतिहास रचला आहे. डॅनियल फार्क यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या लीड्स संघानं या विजयासह तब्बल 39 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर एफए कपच्या उपांत्य फेरीत (Semi-final) धडक मारली आहे. शेवटच्या वेळी लीड्स संघ 1986-87 च्या हंगामात या स्पर्धेच्या या (सेमीफायनल) टप्प्यावर पोहोचला होता.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच लीड्स आक्रमक अंदाज दाखवत खेळत होता. खेळाच्या 26 व्या मिनिटाला आओ तनाका यानं उत्कृष्ट गोल करून लीड्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात, म्हणजेच 75 व्या मिनिटाला, डोमिनिक कॅल्व्हर्ट-लेविन यानं मिळालेल्या पेनल्टीवर अचूक गोल करत ही आघाडी 2-0 अशी मजबूत केली. विजय निश्चित वाटत असतानाच वेस्ट हॅमनं Injury Time मध्ये अविश्वसनीय पुनरागमन केलं. माटेयस फर्नांडिस आणि एक्सल डिसासी यांनी 90 व्या मिनिटानंतर लागोपाठ दोन गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला आणि अतिरिक्त वेळेत (Extra Time) नेला.
अतिरिक्त वेळेत वेस्ट हॅमचे दोन गोल ‘ऑफसाईड’मुळे नाकारण्यात आल्यानं सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. येथे लीड्सचा गोलरक्षक लुकास पेरी हा खरा नायक ठरला. त्यानं वेस्ट हॅमच्या जॅरॉड बोवेन आणि पाब्लो यांचे प्रयत्न यशस्वीपणे रोखले, तर लीड्सच्या पास्कल स्ट्रुईकनं निर्णायक पेनल्टी गोलमध्ये रूपांतरित करून संघाचा 4-2 असा विजय निश्चित केला.
पुढचा सामना
या ऐतिहासिक विजयामुळे लीड्सचा संघ आता वेम्बली स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीसाठी सज्ज झाला आहे. लीड्सचा पुढचा सामना आता बलाढ्य चेल्सी विरुद्ध 25 किंवा 26 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. लीड्सच्या चाहत्यांना आशा आहेत की, ते चेल्सीविरूद्धचा हाही सामना जिंकतील.

