ISL 2026: इंडियन सुपर लीगच्या (ISL) चालू हंगामातील एका चुरशीच्या लढतीत बेंगळुरू एफसीनं (BFC) यजमान एफसी गोवाचा त्यांच्याच घरच्या मैदानात 2-0 असा पराभव करून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. शनिवार, 4 एप्रिल 2026 रोजी गोव्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (फातोर्डा) हा सामना पार पडला.
सामन्याची सुरूवात झाल्यापासूनच बेंगळुरूनं आक्रमक खेळायला चालू केलं होतं. खेळाच्या अवघ्या तिसऱ्याच मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीनं आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत ब्रायन सांचेझच्या पासवर गोल केला आणि बेंगळुरूला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे यजमान गोव्याचा संघ दबावाखाली आला. संपूर्ण सामन्यात गोव्यानं गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूनं भिंतीसारखं उभं राहून काही अप्रतिम बचाव केले आणि आपली ‘क्लीन शीट’ राखली.
सामना संपायला काही मिनिटं शिल्लक असताना, बदली खेळाडू म्हणून आलेल्या नामग्याल भुतियानं 90 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून बेंगळुरूचा विजय निश्चित केला. या विजयामुळे बेंगळुरूचे आता 7 सामन्यांतून 14 गुण झाले असून ते जेतेपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत.
आयएसएलचा हा 12 वा हंगाम 14 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या दिमाखात सुरू झाला असून यात एकूण 14 संघ सहभागी आहेत. बेंगळुरू एफसीचा आता पुढचा सामना 11 एप्रिल 2026 रोजी आपल्या घरच्या मैदानात म्हणजेच बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर केरळ ब्लास्टर्स एफसी विरुद्ध रंगणार आहे. तर पराभूत झालेल्या एफसी गोव्याला 10 एप्रिल रोजी ओडिशा एफसीविरुद्ध मैदानात उतरावे लागेल.

