Khelo India Tribal Games 2026: छत्तीसगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या-वहिल्या ‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स’ (Khelo India Tribal Games 2026) चा समारोप काल मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत कर्नाटकनं सुरुवातीपासूनच आपलं वर्चस्व राखत पदकतालिकेत अव्वल स्थान गाठलं. तर यजमान छत्तीसगडच्या शेजारील राज्य ओडिशानं पदकतालिकेत सर्वाधिक पदके जिंकून आपली ताकद दाखवून दिली. ही स्पर्धा 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत यजमान छत्तीसगडमधील तीन प्रमुख शहरांमध्ये पार पडली. विविध खेळांचे आयोजन रायपूर, जगदालपूर (बस्तर) आणि अंबिकापूर (सरगुजा) येथे करण्यात आलं होतं.
सहभाग आणि पदकतालिकेतील आघाडीची राज्ये
या स्पर्धेत देशातील तीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे तीन हजार आठशे आदिवासी खेळाडूंनी नऊ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत भाग घेतला होता.
1. कर्नाटक – 23 सुवर्णपदकांसह प्रथम स्थान मिळवून विजेता ठरला.
2. ओडिशा – 21 सुवर्णपदकांसह दुसरं स्थान मिळवलं.
3. झारखंड – 16 सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिलं.
4. महाराष्ट्र – 6 सुवर्णपदकांसह चौथं स्थान पटकावलं.
5. अरुणाचल प्रदेश – 6 सुवर्णपदकांसह पाचवं स्थान मिळवलं.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश भारताच्या दुर्गम भागातील आदिवासी समुदायातील खेळाडूंना शोधणे आणि त्यांना मुख्य प्रवाहातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठाशी जोडणे हा आहे. आदिवासी भागातील पारंपारिक क्रीडा कौशल्याला जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षणाद्वारे ऑलिम्पिक स्तरावर नेण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी या स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढत देत राज्याला पदकतालिकेत सन्मानाचं स्थान मिळवून दिलं. महाराष्ट्रानं ॲथलेटिक्स, जलतरण आणि कुस्ती यांसारख्या खेळांमध्ये विशेष चमक दाखवली. जलतरणात भक्तिश राजेंद्र कुमरे यानं शंभर मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात कडवी झुंज देत उल्लेखनीय कामगिरी केली. एकूण सहा सुवर्णपदकं, दहा रौप्य पदकं आणि चार कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्रानं आपली अष्टपैलू क्रीडा प्रतिभा सिद्ध केली आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे आता आदिवासी खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) विविध केंद्रांवर प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

