SAFF U20 Championship 2026: मालदीवमध्ये सुरू असलेल्या SAFF U20 चॅम्पियनशिप 2026 (SAFF U20 Championship 2026) च्या अंतिम सामन्यात आज (शुक्रवारी, 3 एप्रिल 2026 रोजी) भारत आणि बांगलादेश हे प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. दक्षिण आशियाई फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी ‘SAFF U20 चॅम्पियनशिप’ आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही स्पर्धा माले येथील नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे.
पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. पुढचा बांगलादेशविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर उपांत्य फेरीत (Semi-final) भूतानचा 5-0 असा धुव्वा उडवत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला. म्हणजेच भारतीय संघानं या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
रेकॉर्ड
भारतानं आतापर्यंत ही स्पर्धा 4 वेळा (2019, 2022, 2023 आणि 2024) जिंकली आहे. जर भारतानं आज बांग्लादेशवर विजय मिळवला तर भारतीय संघ पाचवा किताब जिंकेल.
दोन्ही देशांमधील सामने नेहमीच चुरशीचे झाले आहेत. 2022 च्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5-2 असा पराभव करून जेतेपद पटकावलं होतं. मात्र, यंदाच्या गट फेरीत बांगलादेशनं भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखलं, त्यामुळे आजचा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता असून अनेक भारतीय फुटबॉल चाहत्यांचं लक्ष या सामन्याकडं लागलं आहे.
या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व सूरज सिंग अहैबम (Suraj Singh Aheibam) करत आहे. त्यामुळे आता कर्णधार कोणती रणनीती वापरणार आणि संघाला कसं पाचवा किताब जिंकून देणार याकडं भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत. भारताकडून या स्पर्धेत आतापर्यंत ओमंग डोडुम (Omang Dodum) यानं सर्वाधिक 3 गोल केले आहेत. तसेच विशाल यादव आणि रोहेन चाफमयुम यांनीही मोलाचं योगदान दिलं आहे.

