IPL 2026: इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज बेन डकेटनं आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वीचं माघार घेतल्यानं दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) संघाला मोठा धक्का बसला आहे. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत तो दिल्लीसाठी सलामीची धुरा सांभाळणार होता, मात्र आता त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाला ऐनवेळी पर्यायी खेळाडूचा शोध घ्यावा लागत आहे.
माघार घेण्याचे कारण
डकेटनं आपल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, “IPL मधून माघार घेण्याचा हा निर्णय खूप अवघड होता पण आगामी उन्हाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामासाठी (विशेषतः न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका) स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे”. असं त्यानं म्हणत हा निर्णय घेतला आहे. तसेच त्यानं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिल्ली संघ आणि चाहत्यांची माफी सुद्धा मागितली आहे.
बेन डकेटला दिल्ली कॅपिटल्सनं मागील लिलावात २ कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केलं होतं. पण आता त्यानं या स्पर्धेतून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे संघावर दबाव वाढला आहे.
दोन वर्षांची बंदी (IPL Ban)
बीसीसीआयनं (BCCI) 2025 च्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या माघारीबाबत नियम अधिक कडक केले आहेत. रिपोर्टनुसार, जर एखादा खेळाडू लिलावात विकला गेल्यानंतर कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय (Injury/Medical reason) स्पर्धेतून माघार घेतो, तर त्याला दोन वर्षांसाठी (2 हंगाम) आयपीएल आणि लिलावातून निलंबित केलं जाऊ शकतं. यामुळे डकेटवरही आता पुढचे दोन वर्षांची बंदी आणली जाऊ शकते. आणि हे झालं तर तो (बेन डकेट) आयपीएल हंगामात खेळू शकणार नाही, म्हणजेच तो थेट दोन वर्षांनीच लिलावात दिसू शकेल.
हॅरी ब्रुक
डकेटच्या आधी इंग्लंडच्याच हॅरी ब्रुक (Harry Brook) याला देखील अशाच कारणामुळे बंदीचा सामना करावा लागला होता. ब्रुकला 2025 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं 6.25 कोटींना विकत घेतलं होतं, मात्र त्यानं ऐनवेळी माघार घेतल्यानं बीसीसीआयनं त्याच्यावरही दोन वर्षांची बंदी घातली होती. या दोन्ही घटनांमुळे आयपीएलमधील विदेशी खेळाडूंच्या कमिटमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दिल्लीचा पहिला सामना कधी?
दिल्ली कॅपिटल्स आपला 2026 चा पहिला सामना 1 एप्रिल 2026 रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध खेळणार आहे. डकेटच्या जागी आता श्रीलंकेचा पथुम निसंका किंवा पृथ्वी शॉ यांना सलामीची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

