IPL 2026: आयपीएल 2026 च्या रणधुमाळीला 28 मार्चपासून सुरुवात होत असतानाच, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलनं आयपीएलच्या एका नियमावर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. याआधी सुद्धा अनेक दिग्गज खेळाडूंनी या नियमाला विरोध केला आहे. त्यातच आता नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) माध्यमांशी संवाद साधताना अक्षरनं ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा जाहीर निषेध केला.
अक्षर पटेल नक्की काय म्हणाला?
अक्षर म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला वैयक्तिकरित्या हा नियम अजिबात आवडत नाही. मी स्वतः एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि या नियमामुळे अष्टपैलूंचं महत्त्व कमी झालं आहे. पूर्वी संघात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकणाऱ्या अष्टपैलूला प्राधान्य दिलं जायचं, पण आता संघ व्यवस्थापन एखाद्या विशिष्ट फलंदाजाला किंवा गोलंदाजाला ‘इम्पॅक्ट सब’ म्हणून वापरत आहे. यामुळे आमच्यासारख्या खेळाडूंची भूमिका मर्यादित होत आहे”. जरी वैयक्तिक मत विरोधात असले तरी, नियम हे नियम आहेत आणि त्यांचे पालन करावेच लागेल, असेही त्यानं मिश्किलपणे नमूद केलं.
यापूर्वी कोणाकोणाला हा नियम आवडला नाही?
अक्षर पटेल हा या नियमावर टीका करणारा एकमेव खेळाडू नाही. याआधी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी या नियमाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
रोहित शर्मानं स्पष्टपणे सांगितलं होतं की, हा नियम क्रिकेटच्या 11 खेळाडूंच्या मूळ संकल्पनेच्या विरोधात असून तो अष्टपैलूंच्या प्रगतीसाठी घातक आहे.
विराट कोहलीनंही या नियमामुळे खेळाचा समतोल बिघडत असल्याचं आणि गोलंदाजांवरील दबाव वाढल्याचं मत मांडलं होतं. तसेच भारताचा अष्ठपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यानंही या नियमा विरोधात आवाज उठवला होता.
दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना
दिल्ली कॅपिटल्स आपला 2026 ची आयपीएल मोहीम 1 एप्रिल 2026 रोजी सुरू करणार आहे. त्यांचा पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध लखनौच्या इकाना स्टेडियमवर होणार आहे.

